खर्डा:८ सप्टेंबर २०२६
जामखेड तालुक्यातील धामणगाव व खर्डा परिसरात शेळ्यांच्या नवजात करडांना अज्ञात आजाराची लागण होत असल्याने शेळीपालक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. करडांचे डोळे लाल होणे, दृष्टी जाणे आणि आजारी पडल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत ती दगावणे अशा गंभीर घटना घडत आहेत. अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे शेळीपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, पशुसंवर्धन विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
धामणगाव येथील शेळीपालक अंगत कदम यांच्या शेळ्यांच्या नवजात करडांना या आजाराची लक्षणे दिसून आली असून, त्यातील काही करडे दगावली आहेत. खर्डा शहरासह संपूर्ण धामणगाव परिसरात सध्या करडांचे डोळे लाल होणे, आंधळेपणा येणे आणि बुळकांडी लागणे (हागवण) यांसारख्या विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढल्याचे निदर्शनास येत आहे.
हा आजार नेमका कोणता आहे, त्याचा प्रसार कशामुळे होत आहे आणि त्यावर कोणते उपचार करावेत, याबाबत सध्या शेतकऱ्यांमध्ये कमालीचा संभ्रम आहे. ग्रामीण भागात शेळीपालन हा अनेक अल्पभूधारक व शेतमजूर कुटुंबांच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहे. त्यामुळे करडांचा अचानक मृत्यू होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन पशुसंवर्धन विभागाने धामणगावसह परिसरात तातडीने पशुवैद्यकीय पथक पाठवावे. आजारी शेळ्या व करडांची मोफत तपासणी करून आजाराचे नेमके कारण शोधावे, तसेच शेतकऱ्यांना योग्य उपचार, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, अशी जोरदार मागणी परिसरातील शेळीपालकांकडून होत आहे.
