जामखेड (प्रतिनिधी)१३ सप्टेंबर २०२६
समता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक संतोष गव्हाळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोळे वस्ती येथे भटके-विमुक्त व आदिवासी समाजातील नागरिकांसाठी ‘जातीचा दाखला नोंदणी कॅम्प’ आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, एकाच दिवसात तब्बल ७३ प्रस्ताव जमा करण्यात आले आहेत.
या विशेष कॅम्पचे नियोजन लोकविकास सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मुस्तफा शेख मेजर व सचिव राजू शिंदे यांच्या सहकार्याने करण्यात आले. कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन नगरसेवक संतोष गव्हाळे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी समता ग्रुपचे मार्गदर्शक नानासाहेब गव्हाळे, पै. युवराज डाडर, तुषार शिरोळे, आदिवासी नेते मधुकर पवार यांच्यासह विविध क्षेत्रांतील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कॅम्पमध्ये वडार, कैकाडी, नाथपंथी डवरी गोसावी, डोंबारी, आदिवासी पारधी, मांग गारुडी, मदारी यांसह भटके-विमुक्त व आदिवासी समाजातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. उपस्थितांना दाखल्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कॅम्पमध्ये जमा झालेल्या सर्व ७३ प्रस्तावांची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून लवकरच नगरसेवक संतोष गव्हाळे यांच्या हस्ते सर्व लाभार्थ्यांना जातीच्या दाखल्यांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात येईल.”
— राजू शिंदे (सचिव, लोकविकास सेवाभावी संस्था)
सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम
शासकीय योजना, शैक्षणिक सवलती आणि विविध लाभांसाठी जातीचा दाखला हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. कागदपत्रांअभावी अडकलेल्या गरजू नागरिकांना हा दाखला सुलभतेने मिळावा, यासाठी राबवलेल्या या उपक्रमाचे समाजबांधवांकडून जोरदार स्वागत करण्यात आले.
वाढदिवसाचा केवळ सोहळा न साजरा करता खर्डा लगत असणाऱ्या नळी वडगाव येथील वृद्धाश्रमात अन्नदान करून व भटके-विमुक्त व आदिवासी समाजाला मिळणार हक्काचे दाखले अशा प्रकारचा अत्यंत समाजोपयोगी उपक्रम राबवून संतोष गव्हाळे यांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
