श्रीगोंदा / अहिल्यानगर:१३ सप्टेंबर २०२६
बेलवंडी ते श्रीगोंदा रस्त्यावर मुरूम-मातीचे हप्ते न दिल्यावरून एकावर कोयत्याने व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करणाऱ्या टोळीतील आरोपींना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत मुख्य आरोपीसह एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, इतर साथीदारांनाही गजाआड करण्यात आले आहे.
काय घडली होती घटना?
दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री नितीन ज्ञानदेव हिरवे (रा. बेलवंडी, ता. श्रीगोंदा) हे त्यांच्या साथीदारासह घरी जात असताना सचिन भागवत, सुजीत इथापे आणि इतर १० ते १५ जणांनी स्वीफ्ट कारने त्यांचा रस्ता अडवला. “मुरूम-मातीचे हप्ते देत नाही” या कारणावरून संशयितांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने नितीन हिरवे आणि त्यांच्या सोबतच्या लोकांना कोयत्याने व लोखंडी रॉडने गंभीर मारहाण केली. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांचा थरारक पाठलाग आणि कारवाई
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये व त्यांच्या पथकातील दोन विशेष पथके तयार करण्यात आली.
दिनांक १३ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्ह्यातील आरोपी सचिन उर्फ चिंग्या भागवत हा नांदगाव शिंगवेनाईक परिसरात थार गाडीसह थांबल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ त्या भागात छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच थार गाडीतील काही आरोपींनी भरधाव वेगाने पळ काढला, मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत घटनास्थळावरून दोघांना ताब्यात घेतले:
१) सचिन उर्फ चिंग्या सोपान भागवत (वय २९, रा. चिंभळा, ता. श्रीगोंदा)
२) एक विधीसंघर्षीत (अल्पवयीन) बालक (वय १७, रा. कोळगाव, ता. श्रीगोंदा)
पुणे बायपासवरून इतर आरोपी जेरबंद
तसेच, इतर काही आरोपी आळेफाटा मार्गे मुंबईच्या दिशेने पळून जात असल्याची पक्की माहिती पथकाला मिळाली. पोलिसांनी तात्काळ आळेफाटा (जि. पुणे) बायपास परिसरात सापळा रचून उड्डाणपुलाखालून आणखी दोघांना ताब्यात घेतले:
३) संजय उर्फ बाबा मोहन पवार (वय ३१, रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा)
४) अमोल पोपट ब्राम्हणे (वय ३१, रा. जोशीवाडी, ता. शिरूर, जि. पुणे)
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सपोनि हरीष भोये तसेच पोलीस अंमलदार अतुल लोटके, राहुल द्वारके, दिपक घाटकर, अरविंद भिंगारदिवे, पंकज व्यवहारे, अमोल कोतकर, प्रताप देवकाते, दिपक जाधव, सागर ससाणे, रोहित मिसाळ, मनोज साखरे, रोहित येमुल, फुरकान शेख, प्रशांत राठोड, भगवान धुळे आणि जालींदर साखरे यांच्या पथकाने केली.
ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींना पुढील तपासासाठी बेलवंडी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
