जामखेड प्रतिनिधी | १२ ऑगस्ट २०२६
जामखेड : जातेगाव ग्रामपंचायतीशी संबंधित कामासाठी तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना ग्रामपंचायत अधिकारी महादेव मल्हारी ढाकणे (वय ५२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई ११ ऑगस्ट रोजी जामखेड शहरातील हॉटेल महाभागवती परिसरात करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे ग्रामपंचायतीशी संबंधित काम होते. या कामासाठी ग्रामपंचायत अधिकारी महादेव ढाकणे यांनी तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. त्यानुसार ११ ऑगस्ट रोजी जामखेड येथील हॉटेल महाभागवती परिसरात तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अधिकारी महादेव ढाकणे यांना पथकाने पकडले.
या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या पर्यवेक्षणाखाली आणि पोलीस निरीक्षक सविता तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा पथकात पोलीस नाईक चंद्रकांत काळे, पोलीस कॉन्स्टेबल शेखर वाघ आणि पोलीस हवालदार करांडे यांचा सहभाग होता.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध तक्रार करण्याचे आवाहन विभागाने केले आहे
