श्रीगोंदा प्रतिनिधी | ११ ऑगस्ट २०२६
श्रीगोंदा : अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांची माहिती घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. या सूचनांनुसार श्रीगोंदा शहर आणि परिसरात गुटखा, पानमसाला तसेच सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्यांविरोधात छापेमारी करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १० ऑगस्ट २०२६ रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंचांसमक्ष तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला. पोलिसांनी एकूण १ लाख १० हजार ९७६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या कारवाईत ६३ हजारांचा मुद्देमाल
पहिल्या छाप्यात स्वप्नील भिमराव कवडे (वय ३२, रा. होले मळा, श्रीगोंदा) याच्यावर कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील अमोल रामदास जाधव (रा. लिंपनगाव, ता. श्रीगोंदा) हा फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत ६३ हजार १६ रुपये किमतीचा पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला.
याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७४७/२०२६ नोंदविण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या छाप्यात ३५ हजार ८६० रुपयांचा साठा
दुसऱ्या कारवाईत अवधुतनगर, श्रीगोंदा येथील बन्सी गंगाधर काळे (वय ६२) याच्यावर कारवाई करण्यात आली. या प्रकरणातही अमोल रामदास जाधव याचे नाव समोर आले असून, तो फरार आहे. या छाप्यात ३५ हजार ८६० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७४८/२०२६ नोंदविण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मालाची पोलिसांकडून नोंद घेण्यात आली असून, आरोपींच्या भूमिकेचा तपास सुरू आहे.
तिसऱ्या कारवाईत १२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल
स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तिसऱ्या छाप्यात अल्ताफ गुलाब मुजावर (वय ५४, रा. तान्हाई अपार्टमेंट, श्रीगोंदा) याच्यावर कारवाई केली. या प्रकरणातील सलीम दिलावर पिरजादे (रा. अजनूज, ता. श्रीगोंदा) हा फरार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या कारवाईत १२ हजार १०० रुपये किमतीचा पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७४९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
फरार आरोपींचा शोध सुरू
या तिन्ही कारवायांमध्ये एकूण 6आरोपींची नावे समोर आली आहेत. त्यापैकी काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, अमोल रामदास जाधव आणि सलीम दिलावर पिरजादे हे फरार आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या अवैध विक्रीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे अशा प्रकारची विक्री करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस अंमलदार गणेश लोंढे, अमोल कोतकर, मनोज साखरे, प्रताप देवकाते, सुनील मालणकर आणि बाळासाहेब गुंजाळ यांच्या पथकाने छापेमारी केली.
या कारवाईनंतर श्रीगोंदा परिसरासह जामखेड तालुक्यात देखील अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांच्या पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
