जामखेड, प्रतिनिधी : 11 ऑगस्ट 2026
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे लढा देत कर्जमाफीच्या जाचक अटी सरकारला रद्द करण्यास भाग पाडणारे तसेच कांदा उत्पादकांच्या हक्कासाठी केलेल्या आंदोलनाला यश मिळवून देणारे आमदार रोहितदादा पवार यांचा जामखेड येथे जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
कर्जमाफीच्या प्रश्नावर आमदार रोहितदादा पवार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अन्नत्याग आंदोलन केले. त्यानंतर राज्यभर रास्ता रोको आंदोलन उभे राहिले. शेतकऱ्यांच्या या आक्रमक लढ्याची दखल घेत अखेर सरकारला कर्जमाफीच्या जाचक अटी रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. हा रोहितदादा पवार यांच्या आंदोलनाचा मोठा विजय असून या निर्णयाचा राज्यातील सुमारे ३६ लाख शेतकऱ्यांना लाभ झाला.
कांदा उत्पादकांच्या प्रश्नावरही रोहितदादा पवार यांनी सातत्याने आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले. कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी केलेल्या संघर्षाला यश मिळाले असून, कांद्याच्या दरात प्रति क्विंटल ४००-५०० रुपयांवरून २,५०० रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली व या आंदोलनाचा सुमारे १२ लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लाभ झाला.
*विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरही संघर्ष*
शेतकऱ्यांबरोबरच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरही आमदार रोहितदादा पवार यांनी सातत्याने आवाज उठवला. MPSC परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय घेण्यासाठी सरकारला भाग पाडले, तसेच पेपरफुटीच्या घटनांवर सरकारला निर्भयपणे धारेवर धरत विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी संघर्ष केला.
शेतकरी आणि कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर केलेल्या आंदोलनाला मिळालेले यश तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी उभारलेला संघर्ष याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
*पंचायत समितीसमोर स्वागत; भव्य मिरवणूक*
गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता साई गार्डन, नगर रोड, जामखेड येथे हा जाहीर नागरी सत्कार होणार आहे.
सत्कार समारंभापूर्वी पंचायत समिती कार्यालयासमोर आमदार रोहितदादा पवार यांचे भव्य स्वागत करण्यात येणार असून, तेथून त्यांना भव्य मिरवणुकीने साई गार्डन येथील कार्यक्रमस्थळी नेण्यात येणार आहे.
या नागरी सत्कार सोहळ्यासाठी जामखेड तालुक्यातील शेतकरी, कांदा उत्पादक, विद्यार्थी, युवक, नागरिक तसेच महाविकास आघाडी व मित्रपक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
