जामखेड (प्रतिनिधी):३ ऑक्टोबर २०२६
जामखेड तालुक्यातील नान्नज येथे शुक्रवारी (२ ऑक्टोबर) पहाटेच्या सुमारास एका घरात घुसून चार अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्याला कोयता लावून आणि चार महिन्यांच्या बाळावर पाय ठेवण्याचा धाक दाखवत तब्बल १४ लाख ६३ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या धाडसी चोरीमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, नान्नज येथील शिवाजीनगर (मदरसाजवळ) राहणाऱ्या सौ. मनिषा श्रीमंत गोरे (वय ४६, व्यवसाय: शिलाईकाम व शेती) यांनी जामखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शुक्रवारी रात्री सुमारे २ वाजता मनिषा गोरे या त्यांच्या चार महिन्यांच्या जुळ्या नातवंडांपैकी एका बाळासोबत बेडरूममध्ये झोपल्या होत्या. पती श्रीमंत गोरे, मुलगा अक्षय, सून प्रतीक्षा व दुसरे जुळे बाळ दुसऱ्या खोलीत झोपलेले होते.
रात्री २ वाजेच्या सुमारास दरवाजाची कडी तोडून तोंडाला मास्क लावलेले चार चोरटे बेडरूममध्ये शिरले. आरडाओरड करू नये म्हणून त्यांनी मनिषा गोरे यांच्या गळ्याला थेट कोयता लावला आणि शेजारी झोपलेल्या चार महिन्यांच्या बाळावर पाय ठेवण्याचा धाक दाखवून त्यांना शांत केले. चोरट्यांनी मनिषा यांच्या कानातील झुमके जबरदस्तीने ओढल्याने त्यांच्या उजव्या कानाची पाळी तुटून त्या जखमी झाल्या.
यानंतर दोघा चोरट्यांनी घरातील इतर सदस्यांना धमकावून कपाटाची उचकापाचक केली. चोरट्यांनी १३ लाख १३ हजार रुपयांचे सोन्याचे हार, नाकातील रिंग, कर्णफुले, साखळी, अंगठी, चांदीच्या पट्ट्या आणि १ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १४ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज पळवून नेला. जाताना चोरट्यांनी बेडरूमला बाहेरून कडी लावून पळ काढला.
कुटुंबीयांच्या आरडाओरड्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेऊन त्यांची सुटका केली. मुलगा अक्षय गोरे याने तात्काळ ११२ नंबरवर पोलिसांशी संपर्क साधला. जखमी मनिषा गोरे यांच्यावर नान्नज येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
तक्रारीनुसार, चोरटे १८ ते २५ वयोगटातील असून त्यांनी तोंडाला मास्क लावले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. तपासासाठी श्वान पथक, फिंगरप्रिंट तज्ज्ञ व फॉरेन्सिक लॅब टीमला पाचारण करण्यात आले आहे.
या धाडसी दरोड्यामुळे जामखेड तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
